अक्षता... अनिल करवीर
या लग्नात आपण वधु-वरांच्या डोक्यावर तांदुळ टाकत असतो. कारण आपला संस्कार आपल्याला असे सांगतो की भटजी ज्या वेळेला मंगलाष्टक म्हणत असतो, त्या वेळेला अक्षता वधु-वरांच्या डोक्यावर पडल्या तर त्यांचा संसार सुखाचा होतो. भटजीने “शुभ मंगल सावधान” म्हटले की आपण वधु-वरांवर अक्षता टाकायच्या एवढं करीत असतो.
पण मंडळी, आपण टाकलेल्या अक्षता पैकी किती अक्षता त्या वधु-वरांच्या डोक्यावर पडतात ? १०% सुध्दा नाही. जवळ जवळ ७०% अक्षता आपण आपल्या समोर उभ्या असलेल्या माणसांच्या डोक्यावर टाकतो. २०% लोक त्या अक्षतांचा विवीध गोष्टी साठी वापर करतात, एखाद्या मित्राला किंवा विशषत: मैत्रीणीला सतविण्यासाठी, कोणा व्यक्ती विरुध्द राग व्यक्त करण्यासाठी, मुद्दामहून बायकांकडे जोरात अक्षता फेकून क्षणीक विकृत आनंद मिळविण्यासाठी...
लग्न छान पार पडतं, लग्नाच्या हॉलमधून बाहेर येताना बहुतेकजण डोक्यावर हात फिरवून आपल्या केसांमधील अक्षता काढतात. सगळी मंडळी गेल्यावर पूर्ण हॉलभर राहतो तांदळाचा सडा... तोही लोकांनी पायानी तुडविलेला...
आपल्या धर्मात म्हटलं जातं “अन्न हे पुर्ण ब्रम्ह”. असे अन्न वाया घालवून व पायदळी तुडवून आपण अन्नाचा अपमान करीत नाही का ?
एका लग्नामध्ये सुमारे ५ किलो तांदळाच्या अक्षता केल्या जातात. एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी अंदाजे ४ लाख लग्न होतात म्हणजे सरासरी २० लाख किलो तांदुळ आपण व्यर्थ वाया घालवितो. एकीकडे जव्हार-मोखाडा येथे लहान मुलं अन्न नाही म्हणून कुपोषित होताहेत आणि आपण सहज लाखो किलो अन्नाची नासाडी करतो.
तुम्ही म्हणाल की तांदुळ नाही टाकायचे तर टाकायचे तरी काय ? १३५ वर्षापूर्वी महात्मा फुले यांनी लग्नाला तांदळा ऐवजी फुलं वापरण्याचा विचार मांडला होता. एकतर फुलं आपण खात नाही, सगळेजण फुले वापरायला लागल्यावर २० लाख किलो फुलांच मार्केट तयार होईल, शेतक-याला, कष्टक-याला काम व पैसा मिळेल.
कोणत्याही वधु-वरांला डोक्यावर तांदळाऐवजी मऊ, मखमली फुलें पडली, त्यात त्यांना आप्तेष्टांचा आशीर्वाद व हळूवार मायेचा ओलावा जाणवेल. माझ्या मित्राला त्याच्या लग्नात अंगावर अलगद फूलांच्या पाकळ्या पडत आहेत हे फारच “रोमॅन्टीक” वाटलं.
आपल्या सारख्या प्रगल्भ व्यक्तींनी हा चांगला पायंडा पाडावा ही इच्छा. सगळ्यांनी असा विचार केल्यास वाचलेले २० लाख किलो तांदुळ अनाथाश्रमात किंवा बाबा आमटेंच्या आनंदवनात पाठविले तर त्याहुन अन्य पुण्य नोहे.......
1 comment:
good.
its really truth yaar.
baki konach mahit nahi.
pan mi nakkich majhya lagnat lal gulabachya paklya thevin.
i m impressed
Post a Comment